संपादकीय – मार्च २०२३
महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, सामाजिक रचनेत त्यांना मानाचे स्थान मिळावे ह्यासाठी गेल्या शतकात अमेरिकेत जो लढा दिला गेला त्याची आठवण राहावी म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. आज एका शतकानंतर तरी त्या लढ्याची उद्दिष्टे पूर्ण झाली का ? महिलांचे समाजातील स्थान कितपत सुधारले ? पार्ल्यासारख्या सांस्कृतिक दृष्ट्या ‘पुढारलेल्या’ समाजात तरी महिलांना सामान हक्क व वागणूक मिळते का ?
‘मुलगा व मुलगी आमच्यासाठी समान आहेत’ असे आपण अभिमानाने सांगतो पण व्यवहारात मात्र जाणता अजाणता फरक केला जातो. मुलगे कितीही उंडारले तरी चालते, त्यांनी थोडीफार व्यसने केली तरी दुर्लक्ष केले जाते पण मुलींनी मात्र सर्व मर्यादा काटेकोरपणे पाळल्याच पाहिजेत अशी अपेक्षा असते. लग्नानंतर तर परिस्थिती फारच बिकट होते. घराचे पावित्र्य राखण्याची, घराण्याच्या परंपरा जतन करण्याची, सर्वांसाठी पडेल ते काम, त्याग करण्याची संपूर्ण जबाबदारी घरातील ‘लक्ष्मी’ चीच, असे गृहीत धरले जाते. पुरुष मात्र स्वत:च्या मनाप्रमाणे वागायला, जगायला मोकळा. ‘आई’ ह्या व्यक्तीला तर आपण देवाच्या शेजारीच बसवतो आणि तिचे जीवन घरातील इतरांच्या, विशेषत: मुलांच्या सेवेसाठीच आहे हे आपण तिला चतुरपणे पटवून देतो. ती बिचारी सुद्धा ह्या भावनिक चक्रव्यूहात अडकून आयुष्यभर राब राब राबते.
गेल्या काही वर्षांमधे परिस्थिती थोडी बदलली आहे हे मात्र मान्य करावे लागेल. आज स्री उमेदीने घराबाहेर पडली आहे. तिचा आत्मविश्वास वाढला आहे. ती नोकरीत, करिअर मध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण ह्यावेळी सुद्धा ‘नोकरी करून सुद्धा घरचे सर्व काम चोख करणारी सुपर मॉम’ असे जाळे तिच्या भोवताली फेकले जाते व ती त्यात अलगदपणे सापडते. नोकरी आणि घर, दोन्हीकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःला हरवून बसते.
‘घरची लक्ष्मी’, ‘आई’, ‘सुपर मॉम’ अश्या वरकरणी देवत्वाच्या जवळ जाणार्या पण प्रत्यक्षात प्रचंड त्याग आणि अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या संकल्पनांमध्ये समाज आजवर स्त्रीला अडकवत आला आहे. ह्या सर्व प्रतिमांचे जोखड बाजूला सारून स्त्री जेव्हा एक माणूस म्हणून जगू शकेल, जेव्हा इतर समाजही तिला खोट्या व फसव्या देव्हार्यात न बसवता आपल्या शेजारी मानाचे, हक्काचे स्थान देईल त्या वेळी ‘महिला दिन’ साजरा करायची गरजच रहाणार नाही. तो दिवस लवकर येवो यासाठी सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा !
ज्ञानेश चांदेकर
संपादक