आफ्रिकेच्या छताला पार्लेकराची गवसणी

आफ्रिकेच्या छताला पार्लेकराची गवसणी

आफ्रिकेच्या छताला पार्लेकराची गवसणी

कॉम्प्युटर, कोडींग आणि कविता यात रमणाऱ्या शैलेश देशपांडेला किलीमांजारो सारख्या आफ्रिकेतल्या या सर्वोच्च पर्वतावर चढाई करायचे साहस प्रत्यक्षात सुचेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं.

१९,३४१ फूट अर्था ५,८४५ मीटर एवढी या किलीमांजारो पर्वताची उंची आहे म्हणजे ह्या पर्वतराजीचं टोक हे एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षाही अधिक उंचीवर आहे. या शिवाय ऑक्सिजन अतिशय विरळ आणि चढाई खडतर आहे.

किलीमांजारो ट्रेक हा लिमोशो राऊट, मचामे राऊट, कोकाकोला राऊट अशा ७ वेगवेगळ्या वाटेने करता येतो. शैलेश देशपांडेने यांने निवडलेला मचामे राऊट हा सात दिवसाचा असून प्रत्येक दिवशी सात ते दहा किलोमीटर चालावे लागायचे आणि दर दिवशी वरच्या अल्टिट्यूड वर नवीन कॅम्प लागत असे. त्या १४ लोकांबरोबर असणारा जवळजवळ ५० लोकांचा तांझानिया मधला सपोर्ट स्टाफ हा भयंकर एनर्जेटिक आणि खेळकर होता. दर दिवशी कॅम्पवर पोचल्यावर ते वेगवेगळी स्वाहिली भाषेतील गाणी म्हणून कंपूचे मनोधैर्य उंचावत असत. पहिल्या दोन दिवसात शैलेशची ऑक्सिजन लेव्हल ९० आणि ८६ अशी खाली जायला लागली परंतु तिसऱ्या दिवशी पंधरा हजार फुटावरुन खाली येऊन १३००० फुटावर राहिल्यामुळे त्याची ऑक्सिजन लेव्हल परत ९६ वर पोहोचली. वाढलेली ऑक्सिजन लेव्हल जणू सांगत होती की त्याची प्रकृती आता हाय अल्टिट्यूटला स्थिरावत आहे आणि शैलेशला जरा हायसं वाटलं.

बघता बघता किलीमांजारोचं टोक म्हणजे स्टेला पॉईंट आणि उहूरू पिक आता टप्प्यात आलं होतं. पण त्यासाठी शैलेश ला करायचा होता तो 36 तासाचा अवघड प्रवास, त्याच्या आयुष्यामधली ही सर्वात खडतर वाट.. समिट डे च्या दिवशी त्याचा कंपू सकाळी आठ वाजता करंगा हट्स कॅम्प मधून निघाला आणि ४ तासात बराफू कॅम्प ला जवळजवळ बारा वाजता पोहोचला. साडे पंधरा हजार फुटावर हा कॅम्प असल्यामुळे हवा अतिशय विरळ झाली होती, जेवणही फार जास्त जात नव्हतं. अशा परिस्थितीत कसंबसं थोडसं जेवून शैलेशसह सगळेच दुपारी आराम करण्यासाठी पडले कारण पुढील टोकापर्यंतची चढाई ही रात्री अकरा वाजता चालू होणार होती. ते तयारी करत असतानाच अचानक संध्याकाळी ७ च्या सुमारास अतिशय मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आणि सर्व मनातून टरकले. मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली की इथवर येऊन आता वर टोकापर्यंत जाता येतं की नाही? परंतु त्यांच्या सुदैवाने बर्फदृष्टी थांबली आणि त्यांना अगदी वेळेवर अकरा वाजता चढाईला परत सुरवात करता आली. रात्रीच्या वेळी सर्व लोकांनी त्यांच्या डोक्यावर हेड टॉर्च लावले होते. हा खडतर प्रवास असल्यामुळे त्या १४ लोकांच्या बरोबर नऊ गाईड होते. स्वाईली भाषेत ते गाईड त्यांना पोले पोले असं सांगत होते अर्थातच एकदम हळूहळू चाला. (आणि मुखाने गजानन बोला हे सर्वांचे मनात चालूच होतं) सात तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि मायनस ३० डिग्री सेंटीग्रेड मध्ये अंगावर तीन ते चार कपड्यांचे लेयर, आजूबाजूला बर्फ आणि सभोवती वाहणारा प्रचंड घोंगावणारा वारा यातून वाट काढत किलीमांजारोच्या टोकावर पोहोचल्यानंतर झालेल्या उत्कट आनंदाचे वर्णन शैलेशला करता येणे शक्य झाले नाही. अ टू माईलस्टोन टू रिमेंबर अँड बकेट लिस्ट आयटम चेकड ऑफ!!!

उहूरू पिकला(स्वाहिली भाषेत स्वातंत्र्य) पोचल्यानंतरचा नजारा फारच विलक्षण होता. एक तर १९ हजार फुटाच्या वरती सगळे होते आणि सूर्य नुकताच उगवला होता. आफ्रिकेतील सर्वात उंच पॉईंटला असल्यामुळे सभोवती नजर फिरवल्यावर फक्त क्षितिजच दिसत होतं. समुद्रसपाटीला असताना जे क्षितिज आपल्याला एक सरळ रेषेत दिसतं ते त्या उंचीमुळे वक्राकार दिसत होतं. वरती असणारं ते मायनस तापमान, सभोवती असणारा बर्फ आणि ज्वालामुखीच्या क्रेटरच्या भोवती असणारा तो मातीचा रंग असं सगळं एकत्रित बघताना शैलेशला जणू परग्रहावर आहोत असाच भास होत होता.

त्याचा पर्वत भ्रमंतीचा प्रवास जरी संपला असला तरी तिथे त्याने जमवलेल्या आठवणी, नवीन बनलेले तांझानियातले मित्र आणि अजून पर्यंत कधीही न अनुभवलेलं असं निसर्ग सौंदर्य शैलेशसोबत आयुष्यभर राहणार होतं. आणि तसेच शैलेश च्या ह्रदयात गुंजणार होतं ते…काहीही न कळता सुद्धा स्वाहिली भाषेत त्याच्या सपोर्ट स्टाफ बरोबर गायलेले हे गाणं..

जाम्बो, जाम्बो ब्वाना, हाभारी सानी, झुरी साना
वगैनी, मक्वारी बिश्वा,किलीमांजारो, हाकुना मटाटा

Back to top