Beyound The Space
ख्यातनाम चित्रकार वसंत सोनवणी यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन Beyound The Space येत्या २६ नोव्हेंबर पासून २ डिसेंबर पर्यंत नेहरू सेंटरच्या कला दालनात भरणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
गेले अनेक वर्ष पार्लेकर असणाऱ्या सोनवणी सरांचे जन्मगाव नाशिक जवळचे निफाड. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या प्रतिष्ठित महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून नंतर तेथेच शिक्षक म्हणून त्यांनीं आपल्या कला जीवनाला प्रारंभ केला आणि २००१ मध्ये जे.जे. चे अधिष्ठाता या नात्याने सोनवणी सर निवृत्त झाले. खऱ्या अर्थाने जे.जे. ही त्यांची कर्मभूमी ठरली. त्यामुळे अर्थातच या संस्थेशी त्यांचे ऋणानुबंध घट्ट आहेत.
त्यांची चित्र प्रामुख्याने अमूर्त शैलीतली असून विलक्षण बोलकी असतात, मानवी भावविश्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारी असतात. त्यांची चित्रं पाहणाऱ्या चित्ररसिकाला प्रसन्न रंगसंगतीतले अमुर्त आकार मोहपाशात अलगद अडकवतात, तर कधी त्यांची चित्रं मनाचा ठाव घेणारी… प्रश्न विचारणारी… भर शहरांत असूनही पाहणाऱ्याला निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी…अशी देखणी आणि संवाद साधणारी असतात.
कलाजगतात इतके अफाट काम सरांनी केलेले आहे हे पाहतांना हे कसं सुचत … असं विचारल्यावर ते म्हणतात “निसर्ग आणि त्यातील वेळोवेळी होणारे बदल मला प्रेरणा देतात.” आणि मग त्यातले बारकावे ते सहजपणे कॅनव्हासवर उतरवतात. पाण्यात पडणारे सूर्यकिरण, त्यांचे प्रतिबिंब, प्रकाशाचे अपवतर्न, त्यातून निर्माण होणारे अनेक भौमितिक आकार, त्यातील रंगछटा, सावली अन प्रकाशाचे कंगोरे, कवडसे असे वर वर बघायला साधे साधे विषय दिसले तरीही सरांच्या कॅनव्हासवर ते अत्यंत उच्च बौद्धिक पातळी गाठतात.
‘आम्ही पार्लेकर’ बरोबर सोनवणी सरांचा संबंध गेल्या अनेक वर्षांपासूनचा. वार्षिक अंकाचं मुखपृष्ठ हा अंकाच्या संबधित सर्वांसाठी आणि वाचकांसाठी देखील एक उत्सुकतेचा विषय असतो आणि दरवर्षी नित्यनेमाने या चित्राच्या संदर्भात सरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आलंय. या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि या वर्तुळातील पार्ल्यातील आणि बाहेरील त्यांच्या संपर्काचा फायदा ‘आम्हीं पार्लेकर’ च्या वार्षिक अंकासाठी वेळोवेळी झाला आहे. चित्रं कशी बघावीत इथपासून ते पार्ल्यातील अनेक चित्रकारांची ओळख आम्हाला सोनवणी सरांमुळे झाली. २०१७ च्या वार्षिक अंकासाठी इतक्या मोठ्या कलाकाराचे चित्र मुखपृष्ठ म्हणून ‘आम्ही पार्लेकर’ला लाभणे ही आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. अशा एका जेष्ठ, अनुभवी आणि प्रतिभा संपन्न चित्रकाराचे प्रदर्शन नेहरू सेंटर सारख्या एका प्रतिष्ठित दालनात होणार आहे, आणि या प्रदर्शनाचा आस्वाद घेणे ही रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. ही संधी रसिक पार्लेकर नक्कीच चुकवणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे