संपादकीय – ऑगस्ट २०२४

संपादकीय – ऑगस्ट २०२४

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची, उपक्रमांची रेलचेल असलेले आपले पार्ले ‘मुंबईची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते व त्याचा आपल्या सर्वांना अभिमान वगैरे असतो. शिक्षणाची छान सोय असलेल्या व अत्यंत सुरक्षित म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या उपनगरात तमाम मराठीजन रहायला, घर घ्यायला धडपडत असतात ह्याचे आपल्याला अप्रूप वगैरे वाटते.

मित्रांनो, ह्या झगमगत्या वास्तवाला एक दुसरी बाजूही आहे आणि ती बघायला फार दूर सुद्धा जायची गरज नाहीये, आपल्या घरातच आहे ती. आपल्या घरी धुणीभांड्यासाठी, झाडूपोत्यासाठी, स्वयंपाकासाठी किंवा इतर घरकामासाठी येणाऱ्या बायका. ही दुसरी बाजू आपल्याला कधीच दिसत नाही, अगदी चंद्राच्या दुसऱ्या बाजूसारखी !

आपल्या व आपल्यासारख्या इतरही घरी रोज ठराविक वेळ गाठणारी व राब राब राबणारी ही बाई आपल्या खिजगणीतही नसते. आपली ऑफिसला रोज वेळेवर पोहोचायला किती दमछाक होते ते जरा आठवा. बरं, वीकेंड आला की आपल्याला पिकनिकचे, आऊटींगचे डोहोळे लागतात, 5 day week चे आपण जोरदार समर्थन करतो पण घरकामाच्या बाईने एखादी जरी सुट्टी मागितली तरी आपल्या कपाळावर आठ्या पडतात. का ? त्याना नसते सुट्टीची गरज ? एखाद दिवस कंटाळा यायचा त्यांचा हक्कही आपण मान्य करायला आढेवेढे घेतो. गेल्या काही वर्षांत आपले पगार, आपली मिळकत अनेक पटींनी वाढली पण त्याचे किंचितही प्रतिबिंब ह्या कमनशीबी बायकांच्या पगारात पडत नाही. अनेक वेळी ह्या बायका नवऱ्याने टाकलेल्या किंवा नवरा दारुड्या असलेल्या असतात. दहा घरी कामे करुन मोठ्या कष्टाने आपल्या चिमुरड्यांना वाढवत असतात, शिकवत असतात. या निष्ठुर जगात नियतीशी भांडण करत ताठ मानेने जगत असतात. वक्तशीरपणा, कामावर पकड व उरक, कितीही श्रम करण्याची तयारी व तडफ, एखाद्या व्यावसायिकालाही लाजवेल अशी उमेद व हिम्मत, तरी पण Job security, provident fund हे शब्दही त्यांच्या कानावर पडलेले नाहीत अजुन. खरंच, नशीब वगळता सर्व काही दिले आहे देवाने. सर्वात कहर म्हणजे घरातली एखादी जरी वस्तु दिसेनाशी झाली तर जिच्यावर आपण ‘हक्काने’ संशय घेतो ती हीच बाई असते. काय म्हणावे या दैवदुर्विलासाला !

मित्रांनो, सुसंस्कृत आणि सुजाण पार्लेकरांनो, हे बदलले पाहिजे. नव्हे, हे बदललेच पाहिजे !

Back to top