संपादकीय – जानेवारी २०२५

संपादकीय – जानेवारी २०२५

पार्लेकरांसाठी नागपूरपेक्षा न्युयाॅर्क जास्त जवळ आहे’ असे मी नेहमी गंमतीने म्हणतो. ज्याप्रमाणे पंजाब हरयाणामधील प्रत्येक कुटुंबातील एकतरी युवक सैन्यात असतो त्याप्रमाणे पार्ल्यातील कुटुंबाचा एकतरी सदस्य परदेशी (बहुतेक अमेरिकेत) असतो, म्हणूनच महाराष्ट्रातील दुष्काळापेक्षा आम्हाला LA मधे लागलेल्या आगडोंबाची चिंता जास्त वाटते. थोडक्यात काय तर आपला भारत देश जरी जगातील सर्वात तरुण देश होण्याकडे वाटचाल करत असला तरी आपले पार्ले मात्र दिवसेंदिवस म्हातारे होत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

यातील गंमतीचा भाग सोडला तरी पार्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सतत वाढत आहे हे सत्य आहे. पार्ल्यातील सध्याचे घरांचे भाव बघता तरुणांना ते कितपत परवडतील याबाबत शंकाच आहे. या कारणाने अनेक तरुण जोडप्यांना पार्ले सोडावे लागते आहे आणि पार्ल्याच्या घरी केवळ म्हातारे आई वडील किंवा काही घरांत तर (जोडीदाराच्या मृत्युमूळे) एकटीच ज्येष्ठ व्यक्ती उरते. अशावेळी रोजच्या खरेदीसाठी, बिले भरण्यासाठी, बँकेतील कामांसाठी त्यांना नोकरांवर अवलंबून रहावे लागते. यातून फसवले जाण्याचे तर भय असतेच पण अश्या व्यक्तीच्या जिवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सध्या वांद्र्याला रहाणार्‍या एका अभिनेत्याच्या घरी केलेल्या चोरीच्या प्रयत्नाची व त्याच्यावरील हल्ल्याची बातमी देशभर गाजत आहे. पार्ल्यात सुद्धा गेल्या काही दिवसात एक दोन घरफोडी झाल्याच्या बातम्या आहेत. अशावेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे व त्यांनी ती नक्कीच वाढवली असेल, पण या बाबतीत नागरिकांनी व सहनिवासांनी सुद्धा खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरी येणार्‍या नोकरांचे आधार कार्ड व घरचा पत्ता घेऊन पोलिसांत नोंदणी करणे, घराला डबल डोअर लावणे, सहनिवासामधे महत्वाच्या ठिकाणी सीसी टिव्ही बसवणे, वाॅचमन ठेवणे या सारख्या सोप्या गोष्टी तरी आपण सर्वांनी केल्याच पाहिजेत ! पटतेय ना ?

Back to top