संपादकीय – जुलै २०२४

संपादकीय – जुलै २०२४

दर वर्षी पाऊस सुरु झाला की निसर्ग हिरवी शाल लपेटून घेतो, धबधबे ओसंडून वाहू लागतात, सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते पण चाकरमानी मुंबईकर मात्र घास्तावलेला असतो. कधी अतिवृष्टी होऊन रस्ते पाण्याखाली जातील, लोकल गाड्या बंद होऊन वहातूक ठप्प होईल ह्याचा काय नेम ! ह्या दिवसांत ऑफिसला वेळेत पोहोचणे व ऑफिस सुटल्यावर घरी जिवानिशी पोहोचणे हे एक दिव्यच असते. शाळा कॉलेजातील पोरे मात्र मस्त हुंदडत असतात. पावसामुळे मिळालेली सुट्टी, ग्राउंडवरील चिखलातला फूटबॉल व इतर खेळ, पावसाळी सहली यात ते आकंठ बुडालेले असतात. तुम्ही म्हणाल, मुंबईतील पावसाळा म्हणजे हे सर्व आलेच, ह्यात वावगे ते काय ?

खरे आहे, ह्यात वावगे काहीच नाही मात्र कधीकधी ह्या सर्वाचा अतिरेक होतो व सगळी झिंग क्षणार्धात उतरते. कधी बेफाम वहाणाऱ्या पाण्याशी खेळ अंगलट येतो, कधी सेल्फी काढण्यासाठी घेतलेली अनाठायी जोखीम जिवावर बेतते तर कधी भर पावसात निसर्गाला आव्हान देत केलेली दऱ्याखोऱ्यातील भटकंती महागात पडते.

नाही नाही, आम्ही साहसाच्या, साहसी वृत्तीच्या अजिबात विरोधी नाहीयोत. किंबहूना प्रत्येकाने साहसी वृत्ती अंगात बाणवलीच पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. मात्र साहसाची सुद्धा एक पद्धत असते, काही नियम असतात, त्याला योग्य प्रशिक्षण व पूर्वतयारी लागते. ही सर्व व्यवधाने न पाळता केलेल्या वेड्या साहसाची परिणिती बहुतेक वेळी अनर्थातच होते.

आता थोडे पार्ल्याविषयी. गेले काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असून सुद्धा पार्ल्यात रस्त्यांवर पाणी भरले आहे व वहातुकीचा खोळंबा झाला आहे असे अत्तापर्यंत तरी झाले नाहीये. त्याचे श्रेय मनपा प्रशासनाला व आमच्या लोकप्रतिनिधींना द्यावे लागेल. त्याचबरोबर अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असल्याने (व गोखले पूल कार्यान्वित झाल्याने) पार्ल्यातील वहातुकीचा प्रवाह सुद्धा हल्ली सुरळीत होत आहे. मात्र रस्त्यावर बेदरकारपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे व फूटपाथवर वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पार्ल्यातील गर्दीचा मुरांबा काही कमी होत नाहीये !

सर्व पार्लेकरांना खड्डेमुक्त, waterlogging मुक्त व सुरक्षित पावसाळ्यासाठी अनेक शुभेच्छा !

Back to top