संपादकीय – मे २०२४
सुमारे शतकभरापूर्वी पार्ले हे मुंबईतील एक छोटेसे टुमदार उपनगर होते. किनाऱ्यालगत असलेल्या कोळी समाजाच्या वस्त्या व इतरत्र पसरलेल्या ख्रिश्चन आणि मराठी वाड्या असे ह्याचे स्वरूप होते. हळूहळू वस्ती वाढू लागली, अनेक वाड्यांच्या जागी सहनिवास उभे राहू लागले. ह्यात मराठी कुटुंबांबरोबरच इतरही समाजातील, मुख्यत्वे गुजराथी कुटुंबे आली. पहिली काही वर्षे पश्चिमेकडे अमराठी व पूर्वेकडे मराठी अशी अलिखित विभागणी होत होती पण हळूहळू पूर्वेकडेही गुजराथी टक्का वाढत गेला. तेव्हापासून म्हणजे सुमारे पाऊणशे वर्षांपासून मराठी व गुजराथी पार्ल्यात राहात आहेत, खरे म्हणजे ‘गुण्यागोविंदाने नांदत आहेत’ असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
अनेकांना आठवत असेल की १९९२-९३ साली मुंबईभर दंगलीचा डोंब उसळला होता, सर्वत्र भीतीचे वातावरण होते. बसेस जाळल्या गेल्या, सरकारी मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले, दुकाने फोडली, जाळली, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईत सर्वत्र असे घडत असताना पार्ले मात्र पूर्णपणे शांत होते. येथे एकही दंगल झाली नाही की दुकान जाळले नाही. मराठी गुजराथी लोकांना तर पार्ल्याविषयी आधीपासूनच आकर्षण होते पण आता दंगलीनंतर पार्ले मुंबईतील सर्वात शांत व सुरक्षित उपनगर म्हणून प्रसिद्धीस आले व पार्ल्याचे incoming वाढू लागले. सर्वच लोकांना हे स्टेशन व एअरपोर्ट जवळ असणारे, शिक्षणाची छान सोय असणारे, सुसंस्कृत, शांत आणि महत्वाचे म्हणजे सुरक्षित उपनगर खुणावत होते. ह्याचाच परिणाम म्हणून पार्ल्याची वस्ती व जागांचे भाव, दोन्ही वाढले.
ह्याच सुमारास पार्ल्यात पुनर्विकासाचे वारे वाहू लागले. जुन्या वाड्या, घरे, छोट्या इमारती ह्यांची जागा टोलेजंग इमारती घेऊ लागल्या व ह्या नवीन फ्लॅट्स मध्ये फक्त मराठी व गुजराथीच नव्हे तर इतरही समाजातील कुटुंबे येऊ लागली. त्यांची संस्कृती, राहण्याची पद्धत, खाण्यापिण्याच्या सवयी ह्या सुद्धा थोड्या वेगळ्या असणारच. आपण सर्वांनीच एकमेकांची सवय करून घेतली पाहिजे. ‘आमच्या सहनिवासात फक्त ह्याच समाजाची कुटुंबे राहातील’ किंवा ‘आमच्या इमारतीत मांसाहार चालणार नाही’ असे हट्ट आता सोडायला पाहिजेत.
गेले शतकभराची एकमेकांशी सौजन्याने वागण्याची, गुण्यागोविंदाने राहण्याची आपली परंपरा आपणच जपली पाहिजे, होय ना !