संपादकीय – सप्टेंबर २०२४

संपादकीय – सप्टेंबर २०२४

सध्या सर्वत्र गणपतीची धामधूम सुरु आहे. पार्ल्यात वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे हा उत्सव गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. नामवंत शिल्पकारांकडून घडवून घेतलेली अत्यंत सुबक मूर्ती, स्थानिक कलाकारांनी तयार केलेला सुंदर देखावा आणि आपल्या गणपतीचे केलेले राजेशाही नामकरण, ह्या सर्वांचे पार्लेकरांना नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे, अभिमान वाटत आलेला आहे.

हे सर्व जरी चांगले असले तरी काही गोष्टी मला खटकतात व त्या येथे नमूद करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्याची प्रथा होती. त्यांनी सादर केलेल्या नाटुकल्या, गाणी, नाच ह्यातूनच उद्याचे कलावंत घडणार आहेत हे आपण विसरून गेलो आहोत का ? दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत वाजवली जाणारी कर्कश्य वाद्ये व बीभत्स गाणी. नाही नाही, मला टिळकांच्या वेळचे वातावरण अपेक्षित नाहीये पण मिरवणूक उत्सवाला अनुरूप तरी असावी की नाही? प्रसंग काय, आपण वाजवतोय काय, नाचतोय कसे ? सगळाच आनंद आहे !

अजून एक महत्वाचा विषय म्हणजे ह्या उत्सवाच्या निमित्ताने केली जाणारी बॅनरबाजी. प्रत्येक उत्सवाच्या ठिकाणी लावलेले राजकीय नेत्यांच्या फोटोंची भाऊगर्दी असलेले असंख्य बॅनर्स देखाव्याचे सौंदर्य झाकोळून टाकतात असे नाही वाटत का कोणाला ? फक्त उत्सवाच्या ठिकाणीच नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी असल्या राजकीय बॅनर्सनी ‘गणेश भक्तांचे स्वागत’ होत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक घोषित होण्याची अपेक्षा आहे. वातावरण निवडणूकमय आहे. सर्वच राजकीय पक्ष इरेला पेटले आहेत. त्यांची मानसिकता मी समजू शकतो पण लोकांच्या नजरेत भरण्याचा हा मार्ग नव्हे.

उंदीरमामा हे बाप्पाचे वाहन आहे पण हे पट्टे बाप्पावरच स्वार होऊ पाहात आहेत. म्हणजे उत्सव राहिला बाजूलाच, ह्यांच्या बॅनरनीच लोकांचे डोळे दीपत आहेत.

माझ्या सर्वपक्षीय मित्रांनो, असल्या बटबटीत बॅनरबाजीमुळे नव्हे तर गेल्या पाच वर्षातील तुमच्या कामगिरीनुसारच तुम्हाला मते मिळणार आहेत. पार्लेकर मतदार तेव्हढे सूज्ञ निश्चितच आहेत !

Back to top