उत्साहात पार पडला पाटिवि ७३ च्या बॅचचा सुवर्ण स्मृती सोहळा

उत्साहात पार पडला पाटिवि ७३ च्या बॅचचा सुवर्ण स्मृती सोहळा

उत्साहात पार पडला पाटिवि ७३ च्या बॅचचा सुवर्ण स्मृती सोहळा

गेले अनेक दिवस गाजत असलेला आणि देश विदेशात उत्सुकता असलेला असा पार्ले टिळक विद्यालय इयत्ता ११ वी १९७३ बॅचचा सुवर्ण महोत्सवी सोहळा दि. 23 एप्रिल 2023 रोजी, शाळेच्याच इंग्रजी माध्यम इमारतीच्या सभागृहात संपन्न झाला.

एकशे चाळीस एवढ्या प्रचंड उपस्थितीने रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्याचे पडसाद अजूनही समाज माध्यमांवर गाजत आहेत.

पारंपारिक वेषभूषेत पारंपारिक रीतीने केलेले स्वागत, रांगोळी, पणत्या, फुलांच्या कमानी, यांनी प्रवेशद्वारापाशीच अभ्यागत भारावून जात होते. व्यासपीठावर शाळेच्या इमारतीची छबी असलेला पडदा, वेळोवेळेची शाळेची रूपे दर्शविणारी छायाचित्रे लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक कट्टा, सेल्फी पॉईट्स, या साऱ्यामुळे तर वातावरण भारून गेले होतेच, त्यात‌च १९७३ मध्ये काढलेले विद्यार्थ्यांचे फोटो आनंदात भर घालत होते.

शाळा भरतांनाची वाजलेली घंटा, तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लावण्यात आलेली ध्वनिमुद्रिका, शाळा सुरू होतांनाची प्रार्थना, काळाच्या पडद्याआड गेलेल्या गुरुजन- विद्यार्थी मित्र यांचे स्मरण, विविध गुण दर्शन आणि सरतेशेवटी एकसुराने गायलेले राष्ट्रगीत, असा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला !

सुग्रास – स्वादिष्ट नाश्ता, आमरस पुरीचे जेवण, थंडगार केशरी पन्हे आणि काहिली शमविणारे गुलाबजाम आईसक्रीम यापरते रसना तृप्तीसाठी आणिक काय हवे ?

त्यानंतर या ५० वर्षात शाळेचे बदललेले रूप, नव्याने निर्माण केलेली दालने, हे सर्व प्रत्यक्ष पाहून शाळेचे ५० वर्षापूर्वीचे विद्यार्थी अतिशय भारावून गेले.

सर्व उपस्थितांना सुवर्ण महोत्सवी सन्मान स्मृती चिन्ह, मनात रेंगाळणाऱ्या शाळेच्या जुन्या इमारतीचे चित्र असलेले शुभेच्छा कार्ड, आवळे, चिंचा बोरांचा शाळकरी खाऊ, साताऱ्याचा ताजा कंदी पेढा इ. देऊन या शाळेबद्दल असलेल्या मधुर स्मृती सदैव जपल्या राहोत अशा शुभेच्छा एकमेकांसाठी व्यक्त करत, फोटोमध्ये आपल्या भेटीबंदिस्त करत उपस्थितांनी एकमेकांचा निरोप घेतला.

Back to top