संपादकीय – एप्रिल २०२३

संपादकीय – एप्रिल २०२३

पार्ल्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सुरक्षित वातावरणामुळे तसेच स्टेशन व एअरपोर्ट यांना जवळ असणार्‍या त्याच्या विशिष्ठ स्थानामुळे अनेक मराठी आणि अमराठी कुटुंबांना पार्ल्यात यावेसे वाटते. येथे अनेक सहनिवासांचा पुनर्विकास होत असून पार्ल्याची लोकसंख्या व पर्यायाने रस्त्यावरील गर्दी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. ‘आपण एका पार्ल्याच्या डोक्यावर दुसरे पार्ले वसवत आहोत’ असे मी नेहमी गमतीने म्हणतो आणि ते खरेही आहे.

वाढत्या गर्दीमुळे पार्ल्याच्या सर्वच नागरी सुविधांवर कमालीचा ताण पडत आहे, भविष्यात जास्तच पडणार आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतुक व पार्किंग, ह्या सर्वच गोष्टीतील गोंधळ हळूहळू वाढत चालला आहे. वाहतूक समस्या तर दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढतच चालली आहे.(त्या प्रमाणात लोकांचा ट्रॅफिक सेन्स मात्र वाढत नाहीये) दोन्ही फूटपाथ वर अनधिकृत फेरीवाले, दुतर्फा पार्क केलेली वाहने व उरलेल्या भागातून माणसे आणि गाड्या यांची ये जा. संध्याकाळी पार्ल्यात फिरावेसे वाटत नाही. जेष्ठ लोकांना तर रस्त्यावरून चालणेच कठीण होऊन बसले आहे. उभे आयुष्य पार्ल्यात काढलेली अनेक कुटुंबे आज केवळ गर्दीच्या कारणामुळे पार्ले सोडून जाण्याचा विचार करत आहेत.

यावर काहीच उपाय नाही का ? नक्कीच आहे. आम्हाला सुचणारे काही उपाय असे : १. सर्व रस्त्यांवर सम-विषम तारखांनुसार एकाच बाजूला पार्किंग करावे. २. महत्वाच्या रस्त्यांवर (महात्मा गांधी, हनुमान, नेहरू) वाहनांसाठी नेहमी No Parking व गर्दीच्या वेळी No Stopping असावे. ३. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी. लोकांनाच चालायला जागा नाही तर यांना का म्हणून द्यावी ? ४. Traffic Flow चा योग्य अभ्यास करून काही रस्ते One Way घोषित करावेत.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, नाही तर मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीला वाहतूक कोंडीची राजधानी म्हणायची पाळी येईल !

Back to top