आम्ही कोण

आम्ही कोण !

मुंबईच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विश्वात स्वतःचा असा वेगळा चेहरा असलेलं उपनगर म्हणजे विलेपार्ले! एक प्रकारे मुंबईची सांस्कृतिक राजधानीच! अशा या पार्ल्यातून मुंबईतील पहिल्या उपनगरीय वार्तापत्राची सुरुवात व्हावी हे स्वाभाविकच ! ९१ पासून पाल्यांचं प्रतिबिंब असलेलं, पार्लेकरांच्या जिव्हाळ्याचं हे वार्तापत्र म्हणजे ‘आम्ही पार्लेकर’! स्थानिक घडामोडींची दखल घेणं, वाचकांना आगामी कार्यक्रमांची माहिती देणं, कलाकार-क्रीडापटू – विद्यार्थी यांच्या यशाची नोंद घेणं, स्थानिक समस्यांना वाचा फोडणं, प्रसंगी पाल्यांतील सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर परखड मत मांडणं आणि लोकप्रतिनिधी व नागरिकांमधील सशक्त दुवा बनणं ही कामगिरी या वार्तापत्राने आजवर चोख बजावली आहे.

सुरुवातील चार पानी कृष्णधवल असलेलं हे वार्तापत्र आताच्या १६ ते १८ पानी रंगीत आवृत्तीपर्यंत कालानुरूप बदलत आहे. यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी अतिथी संपादक म्हणून सहभागी होतात. त्यांच्या आणि वाचकांच्या सूचनांनुसार अंक अधिकाधिक दर्जेदार बनवण्यात येतो. सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील वाचकांना भावतील अशा अभिरुचीसंपन्न सदरांचा, लेखमालांचा, मुलाखतींचा यात समावेश असतो.

वार्षिक विशेषांक हे ‘आम्ही पार्लेकर’चं आणखी एक वैशिष्ट्य! दिवाळी अंकांच्या गर्दीत सामील न होता वर्षअखेरीला हा विशेषांक प्रकाशित करण्याच्या कल्पनेला सुरुवातीपासूनच वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पार्लेकरांच्या भावजीवनाशी सर्वार्थाने समरस झालेल्या ‘आम्ही पार्लेकर’ने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रकाशनाखेरीज अनेक सामाजिक उपक्रम राबवले, काही अभिनव संकल्पना रुजवल्या. त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमः

• पार्ल्यामधील क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी
• संगीत रजनीद्वारे स्थानिक कलाकांना उत्तेजन
• चित्र-शिल्पकला प्रदर्शन
• आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
• कथा कविता स्पर्धा
• पार्ल्यातील महाविद्यालयांमधील बक्षिसपात्र एकांकिकांचे खास प्रयोग
• महापालिकेच्या शाळेत संगणक केंद्र उभारणी
• गरजू विद्याथ्र्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
• अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन
• भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी पाठिंबा सभेचे आयोजन
• मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण
• युवकांची मानसिकता तसेच जेष्ठांची परिस्थिती, गरजा जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण
• स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त बैठका व चर्चासत्रे
• पार्ले पूर्व परिसराचा तपशीलवार नकाशा बनवणे
• नागरिकांच्या जाहीरनाम्याचे संकलन
• विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान उभारले जावे यासाठी जनमताची चाचणी व पाठपुरावा
• पुनर्विकासासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या परिषदेचे आयोजन

ज्ञानेश चांदेकर
संपादक
Back to top