संपादकीय – जुलै २०२३

संपादकीय – जुलै २०२३

मागील महिन्यात १० वी चा रिझल्ट लागला आणि अपेक्षेप्रमाणे पार्ल्याच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. फक्त पार्ले टिळक आणि महिला संघ या नामवंत शाळांतीलच नव्हे तर इतर शाळांतील मुलांनी सुद्धा चांगले मार्क मिळवले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

मुलाचे दहावीचे वर्ष म्हटले कि घरातले वातावरणच बदलून जाते. इतके तास अभ्यास, अनेक क्लासेस, इतके तासच झोप, हेच खायचे, खेळाचे, सिनेमाचे, पिकनिकचे नाव सुद्धा काढायचे नाही, अशी अघोषित आणीबाणी घरात सुरु होते. वर्षभर ह्या जात्यात मूल इतके पिसून निघते कि बोर्डाच्या परीक्षेची वेळ येईपर्यंत त्याचा उत्साह, उमेद, सर्व काही संपते. मनात गोंधळ उडतो, अनेक मुले ह्या अवास्तव दबावामुळे आत्मविश्वास गमावतात, निराशाग्रस्त होतात, खचून जातात. इच्छेविरुद्ध दिलेल्या परीक्षेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागतो आणि आपण सर्व मिळून एक आत्मविश्वास गमावलेला, संपूर्णपणे हरलेला युवक तयार करतो. हो. यात आपला सर्वांचा दोष आहे, पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रमंडळ, सर्व मिळून असे वातावरण तयार करतात कि दहावीची परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यात यशस्वी झाला नाहीत तर तुम्हाला आयुष्यात काहीच करता येणार नाही. ग अमानवी क्रूर प्रघातामुळे अनेक मुले उमलायच्या आधीच कोमेजून जातात याचे भान सुद्धा आपल्याला राहात नाही.

खरंच, किती महत्व आहे दहावीच्या परीक्षेला ? पालकांनी मुलाची आवड ओळखावी, त्याला कुठले। विषय समजतात ? कुठले जड जातात ? ह्याची पारख करावी. मुलाला कशात रस आहे ? अभ्यासाच्या कुठल्या शाखेत तो रमेल ? ह्याचा विचार करावा. त्याला खेळात, चित्रकलेत, संगीतात रस असेल तर मेडिकल, इंजिनीरिंग, आर्किटेक्चर च्या नादाला न लागता त्याच्या आवडीला अनुसरून पर्याय शोधावा. आपली स्वप्ने आपल्या मुलांवर लादू नयेत. ह्याच चुका अनेक पालक करतात व शेवटी पस्तावतात.

‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ ही म्हण आपण सर्व लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण आता इतक्या वर्षांनंतर आयुष्यातील अनेक चढउतार अनुभवल्यावर त्या म्हणीतील सत्यता शंभर टक्के पटते. मुलांनो, जरी दहावीत अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत, अपयश आले तरी गांगरून जाऊ नका, निराश होऊ नका. अजून आपल्याला भरपूर संधी आहेत, अनेक मार्ग आहेत. यश किती वेळा हुलकावणी देईल ? आपण मैदान सोडायचे नाही. आयुष्याच्या खेळाला आता तर कुठे सुरवात होतेये, खरे ना!

Back to top