संपादकीय – जून २०२३

संपादकीय – जून २०२३

गेल्या काही वर्षात सामाजिक माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. हातातील मोबाईलच्या एका क्लिकवर सेवेला तत्पर असणारे Facebook, WhatsApp झालेच तर Twitter हे ॲप्स, त्यामधून २४x७ आदळणारी जगभरातील माहिती, मते मतांतरे, वेगवेगळ्या चांगल्या वाईट, खऱ्या खोट्या क्लिप्स, ह्या सगळ्यात आपण आकंठ बुडून गेलो आहोत. व्यक्त होणे हा एक पर्याय नसुन तो आपला हक्क आहे असा आपला समज झाला आहे. हे आभासी जगच आपल्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे झाले आहे. आपले काम, नातेसंबंध, आपले भावविश्व, ह्या सर्वांनाच सामाजिक माध्यमांनी ग्रासून टाकले आहे.

खरे म्हणजे सामाजिक माध्यमांची उपयुक्तता वादातीत आहे. क्षणार्धात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बातमी पोहोचवण्याची, तुमच्या आवडीप्रमाणे माहितीचे वर्गीकरण करण्याची क्षमता, ह्यामुळे आपल्याला दुनिया ‘मुठ्ठीमें’ आल्याची भावना होणे सहाजिक आहे. आज कॉरपोरेट क्षेत्रातसुद्धा ‘डिजिटलायझेशन’ हा परवलीचा शब्द झाला आहे. WhatsApp ही संपर्काची प्रमुख प्रणाली झाली आहे. सामाजिक माध्यमांचा वापर जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना महामारीत काही काळासाठी वर्तमानपत्रे बंद होती. त्या काळात आपली बातम्यांची भूक सामाजिक माध्यमेच भागवत होती. जे खरे आहे ते नाकारण्यात काहीच हशील नाही.

हे सर्व जरी मान्य केले तरी सामाजिक माध्यमांच्या दुसऱ्या बाजुकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. समाजात गैरसमज, खोट्या बातम्या, अफवा, अनैतिक गोष्टी पसरवण्यासाठी, मित्रांमध्ये भांडणे लावण्यासाठी ह्याच माध्यमांचा सर्रास वापर होत असतो हेही तितकेच खरे आहे. स्वतःला सामाजिक म्हणवणाऱ्या माध्यमांनाही असामाजिक बाजू असतेच!

कुठलेही तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असते. योग्य प्रकारे वापरले तर फायदाच फायदा पण अयोग्य पद्धतीने वापरले तर भयंकर नुकसान. जे तंत्रज्ञान अणूऊर्जा तयार करते तेच तंत्रज्ञान वापरुन अणूबाँबही तयार करता येतो. सामाजिक माध्यमांचेही असेच आहे, नाही का !
मी दर वेळी पार्ल्याचे तुणतुणे वाजवतो, ह्यावेळी थोडा वेगळा आलाप !

Back to top