संपादकीय – एप्रिल २०२४

संपादकीय – एप्रिल २०२४

आचार्य अत्र्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ‘इतर राज्यांना भूगोल असेल पण महाराष्ट्राला भूगोलाबरोबरच इतिहास सुद्धा आहे.’ आपल्या पार्ल्याला सुद्धा हे तंतोतंत लागू पडते. मुंबई शहरात अनेक उपनगरे आहेत. माहीम कॉजवे व शीव पलीकडील मुख्य मुंबई आणि त्यालाच जोडून असणारी पूर्व व पश्चिम उपनगरे. जशी शहरातील वस्ती वाढत गेली तसतशी उपनगरे विस्तारत गेली, लोकसुद्धा परवडणारी घरे शोधत ह्या उपनगरात स्थायिक झाले. ह्यातील बहुतेक उपनगरे ही आर्थिक गरजेपोटी निर्माण झालेली, म्हणूनच बिन चेहेऱ्याची आहेत, फार थोडी आपली ओळख टिकवण्यात, वाढवण्यात यशस्वी झाली आहेत व आपले पार्ले हे निश्चितच त्यापैकी एक आहे.

गेल्या शतकाच्या सुरवातीला मुंबई ही एक कामगार नगरी होती. कापड गिरण्या, कारखाने आणि बंदरावरची माल वहातुक हीच ह्या शहराची वैशिष्ठ्ये होती. हळूहळू नोकरीदार चाकरमानी समाज उदयास आला तो गिरगावच्या आसपास व यथावकाश तो पार्ल्यापर्यंत पोहोचला तो त्याची सर्व वैशिष्ठ्ये घेऊनच !

दीड शतकापेक्षा जास्त मोठी परंपरा असणारे आपले पार्ले आज मुंबईचे एक महत्वाचे उपनगर झाले आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि मुंबईची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिरवणारी आपली पार्लेनगरी आता क्रीडानगरी व उद्योगनगरी म्हणूनही नावारूपाला येत आहे.

नुकतेच ज्येष्ठ साहित्यिका माधवीताई कुंटे ह्यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अष्टपैलू प्रतिभा व आभाळाएवढे कर्तृत्व गाठीशी असूनही सर्वाशी मिळूनमिसळून अत्यंत साधेपणाने वागणाऱ्या माधवीताई म्हणूनच सर्व पार्लेकरांना वंदनीय आहेत.

ह्यावर्षीचा पार्ले भूषण पुरस्कार नुकताच प्रसिद्ध उद्योजक दीपक घैसास ह्यांना प्रदान करण्यात आला. घरी कुठलीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या मेहेनतीने, कर्तृत्वाने आपला उद्योग जगभर पसरवणारे, अनेक आस्थापनांना सल्ला देणारे आणि तरीही अत्यंत साधेपणाने राहणारे, सर्वांमध्ये सहजपणे मिसळणारे दीपकजी आज अनेक तरुणांचे स्फूर्तिस्थान असले तर त्यात नवल नाही.

नुकत्याच इंडोनेशिया मध्ये झालेल्या पिकलबॉलच्या आशियायी स्पर्धेत भारताने उज्ज्वल यश मिळवले आणि त्यात पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा महत्वाचा वाटा होता. ह्या पोरांनी तर आपल्या पार्ल्याचे नाव जगभरात पोहोचवले कि हो !

ह्या आणि अश्या अनेक सिताऱ्यांनी उजळलेल्या आपल्या पार्लेनगरीला ‘नक्षत्रांचे बेट’ म्हटले तर ते चुकीचे ठरू नये, होय ना !

Back to top