संपादकीय – ऑगस्ट २०२३

संपादकीय – ऑगस्ट २०२३

गेल्या दोन तीन वर्षात देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सतत चाललेल्या वार, पलटवार, शह काटशह, पक्षबदल, ह्यामुळे व त्यांच्या सामाजिक माध्यमांवर उमटणाच्या प्रतिक्रियांमुळे सामान्य माणूस गोधळून गेला आहे. चोवीस तास चॅनल्स वर चालणान्या चर्चा, व्हाट्सअप फेसबुक वरील उलट सुलट मत-मतांतरे बाद, भांडणे, समज-गैरसमज. ह्या सर्वांचा आता आपल्या स्वभावावर वागण्यावर परिणाम होऊ लागला आहे. नाही नाही, मी कुठलीही राजकीय भूमिका मांडायला हे लिहीत नसून ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या सर्वांचे फक्त वागणेच नाही तर मनःस्वास्थ्य सुद्धा बिपडत आहे. नातेसंबंध, मैत्री यामध्ये सुद्धा वैमनस्य येत आहे, हे मला सांगायचे आहे.

१९९१ साली भारताने जागतिकीकरणाचा व खुल्या अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला. त्याने देशात औद्योगिक प्रगतीचे वातावरण निर्माण झाले व प्रगती झाली. त्याचबरोबर स्पर्धा व नोकरी धंद्यातील अनिश्चितता सुद्धा वाढली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी संथ गतीने चालणारे आपले जगणे गेल्या काही वर्षात अचानक गतिमान झाले आहे. ह्या सर्व संक्रमणात आपली मानसिकता सुद्धा हळूहळू बदलते आहे. संयम कमी होत आहे, राग पटकन येऊ लागला आहे. विरोधी मत ऐकून घेण्याची प्रवृत्ती कमी होत चालली आहे.

ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा हे आभासी जगच आपल्याला आता खरे वाटू लागले आहे आणि जे आपले खरे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांचे महत्व आपल्यासाठी कमी होत चालले आहे. छोटया छोटया गोष्टींवरून भांडायला आपण तयारच असतो. दुसऱ्याचे मत पटले नाही तर लगेच व्हाट्सअप ग्रुप सोडण्याचे, फेसबुक वर विरोधी विचारांना ब्लॉक करण्याचे प्रमाण गेल्या दोन तीन वर्षात लक्षणीय झाले आहे. आपण मानसिक स्थिरता हळूहळू गमावत चाललो आहोत का ?

कोणी म्हणेल ‘हे सर्व खरे आहे पण ह्यावर उपाय काय ?’ तर उपाय माझ्याकडेही नाही पण जे चालले आहे ते बरोबर नाही हे मात्र जाणवते. आपल्या सर्व मानसिक व शारीरिक व्याधींचा उगम अस्थिर मनापासून होतो असे म्हणतात. त्यामुळे आपला उपाय आपणच शोधायचा आहे आणि अमलात आणायचा आहे. बरोबर ना ?

Back to top