संपादकीय – मे २०२३

संपादकीय – मे २०२३

जगात आज सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देश आज मंदीच्या उंबरठ्यावर आहे. अनेक नोकऱ्या कमी होत आहेत. Facebook, Amazon, Microsoft, सारख्या अवाढव्य कंपन्या सुद्धा हजारो ‘Layoffs’ जाहीर करत आहेत. ह्यात अनेक भारतीय तरुण आहेत व ह्या परिस्थितीत त्यांचे भवितव्य अंधकारमयच दिसत आहे. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण कि आज पार्ल्याच्या बहुसंख्य घरातील तरुण परदेशी आहेत व त्यातील अनेक जण अमेरिकेतच स्थायिक आहेत. त्या अर्थाने पार्ल्याला नागपूर पेक्षा न्यूयॉर्क जवळ आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. विकसित पायाभूत सुविधा, मोकळे कॉर्पोरेट व सामाजिक वातावरण, पैसे कमावण्याच्या व उडवण्याच्या असंख्य संधी, अश्या अनेक गोष्टींमुळे जगभरचे तरुण अमेरिकेकडे आकर्षित होतात. ज्या कारणासाठी कोकणातले यूपी-बिहार मधले लोकं मुंबईला येतात नेमक्या त्याच कारणांसाठी पुण्या-मुंबईतील लोकं अमेरिकेला जातात. हे अनेक दशकांपासून सुरु आहे आणि त्यात मराठी समाज सुद्धा आघाडीवर आहे. अमेरिकेत सुद्धा मराठी लोकांनी आपला ठसा तिकडील समाजावर पाडला आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. दर दोन वर्षांनी तुडुंब गर्दी खेचणारे बृहन् महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हे त्याचेच द्योतक आहे.

मात्र ह्यापुढील काळ अमेरिकेसाठी पूर्वी इतका सुखकर असेल असे नाही. नोकरीची हमी नसेल तर किती मुले फक्त उच्च शिक्षणाच्या हौसेसाठी मोठे कर्ज डोक्यावर घेऊन अमेरिकेला जातील हा प्रश्नच आहे. ह्यातील दुसरा पैलू म्हणजे आज भारताची सुद्धा आर्थिक स्थिती पूर्वी इतकी वाईट नाही. आजमितीला भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जास्त आहे. आज आपल्या देशातच नोकरीच्या उद्योगाच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. युरोप अमेरिकेत जरी मंदी येऊ घातली असली तरी ती भारतात डोकावण्याची सुतराम शक्यता नाही असे बहुतेक तज्ज्ञांचे ठाम मत आहे.

ही सध्याची बदललेली परिस्थिती तरुणांनी, विशेषतः पालकांनी लक्षात घेतली पाहिजे. अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी, नोकरीसाठी व पर्यायाने संपूर्ण आयुष्यासाठी परदेशी जाण्याचा जो प्रघात आपल्याकडे पडला आहे त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे. तुम्हाला काय वाटते ?

Back to top