संपादकीय – डिसेंबर २०२३

संपादकीय – डिसेंबर २०२३

‘आम्ही पार्लेकर’चा २०२३ चा वार्षिक अंक आपल्या हाती देताना आम्हा सर्वांना विशेष आनंद होत आहे व आम्ही आपल्या प्रतिक्रियांची उत्सुकतेने वाट पहात आहोत.

काही दशकांपूर्वी पाल्यांच्या चेहरा हा मुख्यत्वेकरून मराठी मध्यमवर्गीय असा होता पण मधल्या काळात पायांत अनेक बदल झाले. पुनर्विकासाच्या प्रक्रियेने वेग घेतला. मराठी जनांचे तर पार्ले हे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ होतेच पण त्याच बरोबर नव्याने उपलब्ध झालेल्या महागड्या फ्लॅट्समध्ये अनेक बिगर मराठी कुटुंबे सुद्धा आली. हळूहळू पार्त्याच्या बाजार सुद्धा फुलायला लागला, वेगवेगळ्या दुकानांनी सजला. पूर्वी पाांत मोजकीच रेस्टॉरंट्स होती पण आज वेगवेगळ्या थिम्सवर आधारीत असंख्य रेस्टॉरंट्स उघडली आहेत. जवळपास सर्वच महत्वाच्या बँकांच्या सुमारे ४० च्या वर शाखा आज पार्यात कार्यरत आहेत. थोडक्यात म्हणजे एके काळी पुण्याचे जुळे भावंडं वाटणारे, संथ गतीने चालणारे आपले पार्ले आज मुंबईचे एक vibrant उपनगर बनले आहे. ह्या सर्व बदलांचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘आम्ही पार्लेकर’ नेहमीच करत असते. आमची मुळी टॅगलाईन च आहे. ‘प्रतिबिंब बदलत्या पाल्यांचे’ ।

‘वर्षातून एकदा मोठा अंक काढायचा पण तो दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत नव्हे तर आपले वेगळेपण जपत, वर्षअखेरीस ‘वार्षिक अंक’ म्हणून काढायचा’ ह्या विचाराने अनेक वर्षांपूर्वी वार्षिक अंक प्रकाशित करण्याची प्रथा सुरु झाली व ती आजही सुरु आहे. जानेवारी ते नोव्हेंबर हे ११ अंक बहुतांशी पार्थ्यांशी निगडीत असणाऱ्या बातम्या, घडामोडी, कार्यक्रम, उपक्रम ह्यांना वाहिलेले असतात पण वार्षिक अंक हा फक्त पार्लेकरांच्याच नव्हे तर समस्त मराठी माणसांच्या भावविश्वाशी संवाद साधणारा, नाते जोडणारा असावा ह्या विचाराने आम्ही पार्त्यांशी संबंधित नसलेल्या अनेक विषयांचा ह्या विशेषांकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो, ह्याही अंकात केला आहे.

आता थोडे ह्या अंकातील विषयांबद्दल, मराठी मनावर गारुड घालणान्या, आपल्या क्षेत्रात विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींशी, कलावंतांशी, व्यावसायिकांशी मनमोकळ्या गप्पा, २०२३ चे न्यूजमेकर्स, ISRO च्या आगामी अंतरिक्ष योजना, पाकिस्तानचे खडतर भवितव्य, गुदगुल्या करणारी व्यंगचित्रमालिका, पार्ष्यातील कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना, अश्या अनेक वाचनीय सदरांनी खच्चून भरलेला हा ‘आम्ही पार्लेकर’चा वार्षिक विशेषांक आपल्या पसंतीस उतरेल ह्याची खात्री वाटते.

आपणास माहित आहेच कि १९९१ साली सुरु झालेले हे मुंबईचे पहिले वाहिले उपनगरीय वार्तापत्र २०२० च्या मार्च पर्यंत छापील स्वरूपात प्रकाशित होत होते व पार्त्याच्या घराघरात पोहोचत होते. त्यानंतर मात्र कोव्हीड च्या महामारीमुळे सर्वच व्यवहार काही काळापुरते ठप्प झाले होते व आपल्याला स्वतःच्याच घरी कैद व्हावे लागले होते. त्या वेळी आमच्या सारख्या काही प्रकाशनांनी ‘डिजिटल फॉरमॅट’चा आसरा घेतला व वाचकांशी संवाद सुरु ठेवला, आज जवळ जवळ चार वर्षांनी कोव्हीड चा जरी नायनाट झाला असला तरी लोकांची संगणकावर किंवा मोबाईल वर वाचायची सवय तशीच आहे किंबहुना ह्याच गोष्टीला ते जास्त सरावले आहेत. छापील वर्तमानपत्रांची मागणी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक मासिके बंद करायची वेळ प्रकाशकांवर आली आहे. ह्या परिस्थितीत हळूहळू अस्तंगत होणाऱ्या छपाईच्या व्यवसायापाठी धावण्यापेक्षा लोकांच्या पसंतीस उत्तरलेल्या, जगभरात पोहोचू शकणाऱ्या, अत्यंत सोप्या पद्धतीने, शून्य मिनिटात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या व अनेक संधींची दारे ठोठावणाऱ्या डिजिटल माध्यमालाच आम्ही पसंती दिली आहे. येणाऱ्या काळात जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात Digitalization वाढतच जाणार आहे व आपल्याला ह्या नवीन प्रणालीशी, नव्हे जीवनशैलीशी मैत्री करावीच लागणार आहे. होय ना?

सर्व वाचकांना नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !

Back to top