साठ्ये महाविद्यालयात ‘माध्यम महोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा

साठ्ये महाविद्यालयात ‘माध्यम महोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा

साठ्ये महाविद्यालयात ‘माध्यम महोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साठ्ये महाविद्यालयाच्या माध्यम विभागातर्फे आयोजित ‘माध्यम महोत्सव’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देण्याकरता गेली 11 वर्षे विभागातर्फे या महोत्सवाचा दरवर्षी नव्या संकल्पनेसह आयोजन होत असतं. यंदाचा माध्यम महोत्सव ‘भारतीय संस्कृती : जतन समृध्दीचे, वारसा परंपरेचा’ या संकल्पनेवर आधारित होता.याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचा पुरातत्व विभाग आणि साठये महाविद्यालयाचा प्राचीन भारतीय संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १५,१६ आणि १७ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या या महोत्वसाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी- सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. ढोलताशाच्या गजरात मान्यवारांचे आगमन झाले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी वारंग यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले. उत्सवांतर्गत साजऱ्या होणाऱ्या इव्हेंटसबद्दल महाविद्यालयाची भूमिका त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडली. उपप्राचार्य डॉ. दत्तात्रय नेरकर यांनी ख्यातनाम अभिनेत्री निवेदिता जोशी यांचा परिचय करून देत असताना अभिनय क्षेत्रातली त्यांची वाटचाल आणि सोबत त्यांचा युट्युब चॅनेलद्वारे नवीन माध्यमांवर असलेला यशस्वी वावर विशेषत्वाने नमूद केली.

माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा यांनी माध्यम महोत्सवामागची भूमिका विशद केली. विविध संकल्पनांवर विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात काम करतात त्याचा उपयोग त्यांना व्यावसायिक जीवनात होतो हे माजी विद्यार्थ्यांचे दाखले देत सांगितले तर प्राचीन भारताची समृद्धता तरुणांपार्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि अनेक गोष्टी समोर आणण्यासाठी महाविद्यालय अशा प्रदर्शन आणि संशोधनाला प्रोत्साहन देत असते अशा भावना प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे विभागप्रमुख डॉ. सूरज पंडित यांनी व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निवेदिता जोशी-सराफ यांनी तरुणाईच्या उत्साहाचे कौतुक केले. हाती घेतलेलं काम करताना आत्मीयतेने केले पाहिजे तर त्याला तुम्ही न्याय देऊ शकता असा संदेश त्यांनी दिला. आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आहे; पण सोबत या तंत्रज्ञानासोबत मोठा लढा त्यांना द्यायचा आहे. या सद्यपरिस्थितीची देखील जाणीव त्यांनी करून दिली. विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तर देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उदघाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन उपप्राचार्या श्रीमती प्रमोदिनी सावंत यांनी केले.

या महोत्सवाच्या माध्यमातून विविध राज्यांतील संस्कृतीचे प्रदर्शन केले गेले. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या महोत्सवात इन्फोटेनमेंट स्वरुपातील खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांद्वारे केले गेले होते. या खेळांमध्ये अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महोत्सवात विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सचेही प्रदर्शन केले होते.

प्राचीन भारतीय संस्कृतिक प्रदर्शनात अनेकविध पुरातत्वीय वस्तूंची मांडणी केली होती. भारतीय उपखंडातील काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाममधिल विविध प्रदेशातील प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाच्या ठश्याची प्रतिकृती प्रदर्शनस्थळी ठेवली होती. चौल येथिल सुंदर वराह शिल्प, हडप्पा कालीन खापरे, प्राचीन नाणी ,विविध हस्तलिखीते, प्राचीन आभूषयांचे नमुने, अश्मयुगिन हत्यारे, प्राचीन शिल्पे, ताम्रपत्र, शिलालेख अशा अनेक पुरावस्तुंचा यात समावेश होता. मुंबई भूगर्भातील खंडकांचे नमुने, जीवाश्म, खनिजे अश्या विविध गोष्टी प्रदर्शनात मांडल्या होत्या. पारंपरिक खेळ सुद्धा ह्या प्रदर्शनाचे भाग असून हे खेळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होते.

या महोत्सवाला अभिनेता आयुष संजीव आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुन्सर शंतनू रांगणेकर यांनी सदिच्छा भेट दिली.

या महोत्सवाच्या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.केतन भोसले,रसिका सावंत, नारायण परब, गणेश आचवल, स्मिता जैन, सीमा केदारे, राधा सबनीस, निशिगंधा परुळेकर इत्यादी प्राध्यापक मंडळींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

 

Back to top