संपादकीय – फेब्रुवारी २०२४

संपादकीय – फेब्रुवारी २०२४

मुक्या प्राण्यांवर दया करा, प्रेम करा, असे आपल्याला शाळेतच शिकवले जाते आणि ते खरेच आहे. आपल्या संस्कृतीत तर प्राणिमात्रांबरोबरच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी संकल्पना मांडली आहे. आपण या ग्रहावरील निसर्ग चक्राचेच एक घटक आहोत व त्यानुसारच आपली वागणूक राहिली पाहिजे ही भावना त्यामागे आहे. आपण बघतो कि माणूस सोडून इतर सर्व प्राणी निसर्ग चक्राप्रमाणेच वागतात, निसर्गाशी मैत्री करून राहातात, निसर्ग चक्रातील आपले कर्तव्य न चुकता पार पाडतात. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे कि जो निसर्गाशी वैर करून राहतो, त्याचा नाश करतो.

हे सर्व ‘तत्वज्ञान’ आज आठवण्याचे कारण कि नुकतीच आमच्या सहनिवासात श्वान विरोधी बैठक झाली. सहनिवासातील एक दोन घरी असलेल्या श्वानांविषयी सहनिवासाची भूमिका काय असावी ह्याविषयीची ही बैठक होती. दोन्ही पक्ष तावातावाने भांडत होते आणि खरे सांगू, मला दोघांचेही थोडेथोडे पटत होते. अस्मादिकांना काही महिन्यांपूर्वी श्वानदंशाचा प्रसाद मिळाला होता पण तो अपक्ष (आय मीन भटक्या) श्वानाकडून. या भटक्या श्वानांचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यबाबत मात्र दोन्ही पक्षांचे एकमत होते. ह्याबाबतीत कायदा काय सांगतो ह्याची माहिती घेण्याचे ठरले. अनेक वर्षांपूर्वी पार्ल्यातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम स्थानिक प्रशासनाने हाती घेतली होती. तसा विचार करणे आजही संयुक्तिक आहे. इतरत्र रात्री एकट्या दुकट्या माणसाला चोरांची भीती वाटते मात्र पार्ल्यात रात्री एकट्या माणसाला कुत्र्यांची भीती वाटते. हे शहर माणसांच्या मालकीचे आहे, प्राण्यांच्या नव्हे, ही भूमिका सुद्धा बैठकीत सर्वांना मान्य नव्हती.
पाळलेल्या प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा घनघोर चर्चा झाली. त्यांनी सहनिवासात विधी करू नयेत, लोकांच्या (विशेषतः मुलांच्या) अंगावर भुंकू नये, अश्या अनेक जाचक अटी श्वान / मार्जर पालकांवर घालण्यात आल्या पण त्यांनी त्या निर्भीडपणे फेटाळून लावल्या. मात्र घरच्या प्राण्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे, वेळच्यावेळी लसीकरण करणे, अश्या काही गोष्टी सर्वांनीच मान्य केल्या. पाळीव प्राण्यांमुळे घरचे वातावरण सुधारते, मनातील प्रेम भावनेला वाव मिळतो, असेही मुद्दे चर्चेत आले.

बैठकीच्या शेवटी दोन्ही पक्षांचे एकमत झाले पण आमच्या घरी मात्र कुत्रा किंवा मांजर पाळण्यावरून भांडण सुरु झाले. मंडळी, तुम्हाला काय वाटते ? आणावा काय एखादा pet ?

Back to top