संपादकीय – जानेवारी २०२४
हे नववर्ष सर्व पार्लेकरांना आनंदाचे व समृद्धीचे जावो ! वर्षातील पहिलाच अंक घोडा उशिरानेच प्रकाशित होतो आहे त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.
कसे असेल हे वर्ष ? वर्षाच्या सुरवातीलाच सर्व भारतीय ज्याची वर्षानुवर्षे आतुरतेने वाट पाहात होते तो अयोध्येमधील राम मंदिरातील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व्यवस्थित पार पडला हा एक शुभशकूनच म्हटला पाहिजे. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या राम आणि कृष्ण ह्यांनीच हि महान संस्कृती टिकवली व उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अचाट वैविध्य असलेल्या आपल्या देशाला आज एकत्र गुंफून ठेवले आहे ह्यात शंका नाही. राम मंदिराच्या भव्य पुनर्बाधणीत श्रद्धेबरोबरच एक व्यावसायिक गणित सुद्धा आहे. गोव्यात दरवर्षी ७० ते ८० लाख पर्यटक येतात. काश्मीर मध्ये २०२३ साली सर्वात जास्त म्हणजे २.२५ कोटी पर्यटक आले. अयोध्येतील पर्यटकांचा आकडा वापेक्षा कितीतरी जास्त असेल असा प्राथमिक अंदाज आहे. ह्यामुळे केवळ अयोध्येंच्याच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
तसे बघितले तर २०२४ हे वर्ष खूप धामधुमीचे जाणार आहे. एप्रिल मध्ये सार्वत्रिक निवडणूका, त्याच वेळी किंवा त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुका आणि हो, किमान दोन वर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा ह्याच वर्षी अपेक्षित आहेत. ज्याप्रमाणे करोडो लोकांची श्रद्धा राम मंदिर बांधू शकते त्याच प्रमाणे करोडो लोकांचे एक मत योग्य व कार्यक्षम सरकार निवडून देऊ शकते. भारतीय मतदाराच्या प्रगल्भतेचे नेहमीच कौतुक केले जाते. ह्यावेळीही तो अशीच प्रगल्भता दाखवेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
ह्या वर्षी थंडी पडणारच नाही कि काय असे वाटत असतानाच पाल्र्यात गेले काही दिवस बक्क थोडी थोडी थंडी जाणवू लागली आहे. अर्थात नाशिक पुण्याचे लोक पार्त्याच्या ‘थंडी’ला मनसोक्त हसतात व ‘कम्बख्त, तूने पी ही नहीं’ असाच एकूण भाव त्यांच्या चेहेऱ्यावर असतो. कोणी काहीही म्हणोत, आम्ही आमच्या शाली, मफलर, स्वेटर लगेच बाहेर काढणार, नाहीतर त्यांना हवा तरी कधी लागणार ? होय की नाही हो काका?