‘पार्ले स्वरवसंत’ २०२४- अभिजात स्वर मैफिल
सुप्रसिद्ध शास्रीय गायिका, संगीतकार श्रीमती गौरी पाठारे गेली अनेक वर्षे, ‘पार्ले स्वर वसंत’ ह्या संगीत महोत्सवाचे आयोजन करत आहेत. २०२४ चा कार्यक्रम गौरी पाठारे आणि रामांजनेय देवस्थान यांनी एकत्रितपणे आयोजित केला होता. दरवर्षी संगीत प्रेमी या महोत्सवाची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात असतात.
या महोत्सवाचे उद्दिष्ट हे प्रतिभावान, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे असले तरी अनेकदा प्रतिथयश कलाकारही या महोत्सवात सादरीकरण करतात.
यंदा दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी अशा दोन दिवसात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. पहिल्या दिवशी, श्री प्रवीण गावकर यांचे गायन, पं. हिंडोल मुजुमदार यांचे तबला वादन आणि श्रीमती कलापिनी कोमकली यांचे गायन आयोजित करण्यात आले.
मोजके शब्द वापरत कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्रीमती नीरजा यांनी प्रभावीपणे केलं. या महोत्सवात साथ संगत करणारे कलाकारही उच्च क्षमतेचे, जाणकार असतात. ज्यांच्या सहकार्याने कार्यक्रम कमालीचा रंगला.
सारंगीः श्री संगीत मिश्रा, श्री फारुख लतीफ खान.
हारमोनियमः श्री निरंजन लेले, श्रीमती सुप्रिया मोडक जोशी.
तबलाः श्री. मंदार पुराणिक, श्री पुष्कराज जोशी.
या कलाकारांच्या बरोबर गौरी पाठारे यांच्या शिष्य मंडळीनेही साथ दिली.
दुस-या दिवसाचा पहिला कलाकार होता विशीतला, अगदी तरूण असा विराज जोशी. (भिमसेन जोशींचा नातू. )
४ फेब्रुवारी हा दिवसही विशेष महत्वाचा कारण ह्याच दिवशी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती असते.
विराजने, ‘सुमिरन तेरो नाम’, ‘पायलिया झनकार मोरी’ ह्या बोलात, ‘राग पुरिया धनश्री’ ने सुरुवात करून, ‘माझे माहेर पंढरी’ या त्याच्या आजोबांच्या म्हणजेच पं. भीमसेन जोशींच्या आवडत्या अभंगाने समापन केले.
हा दिवस चिरस्मरणीय झाला त्याचं कारण होतं गौरी पाठारे यांनी यावर्षी पासून सुरू केलेला, स्व. डॉ. दामलेंच्या नावाचा सन्मान पुरस्कार! विराज जोशी हा सन्मान पुरस्कार प्राप्त करणारा पहिला कलाकार ठरला.
दुसऱ्या दिवशीचे दुसरे कलाकार होते सुप्रसिध्द व्हायोलिन वादक पं. अतुल उपाध्ये. त्यांच व्हायोलिन कमालीच ‘बोलकं’ होतं. त्यांच वादन हे कमी वेळात प्रभावी सादरिकरण कसं असावं त्याचं प्रात्यक्षिकच होतं. राम भजनाने त्यांनी त्यांच्या वादनाची सांगता केली.
कार्यक्रमाची सांगता ‘पार्ले स्वरवसंत’ च्या आयोजिका गायिका श्रीमती गौरी पाठारे यांच्या गायनाने होणार होती, ज्याची श्रोते कमालीच्या उत्कंठतेने वाट पहात होते.
गौरी पाठारे यांचा ‘सिया संग झुले बगियॉंमे राम ललना’ हा झुला श्रोत्यांना झुला झुलण्याचा आनंद देऊन गेला.
भारतीय संगिताचं जतन, संवर्धन आणि नव्या पिढीला अभिजात संगीताची ओळख हे काम गौरी पाठारे या ‘पार्ले स्वरवसंत’ महोत्सवाच्या उपक्रमाने फार मनापासून करत आहेत.
चारुलता काळे
९८२१८०६८३७