संपादकीय – मार्च २०२४

संपादकीय – मार्च २०२४

नुकताच मराठी भाषा दिन आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक चमकदार कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. आपली भाषा कशी मागे पडत चालली आहे, तिचे भविष्य कसे अंधःकारमय आहे, ह्याविषयी अनेक थोर थोर लोकांनी खंत व्यक्त केली पण मराठी भाषेच्या जोपासनेसाठी काय करायला पाहिजे ह्याबद्दलचे विवेचन त्यांच्या भाषणात अभावानेच आले.

हे खरे आहे की मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. आज तरी बहुतांश पालकांची पसंती इंग्रजी माध्यमालाच आहे हे वास्तव आहे. आजचे युग हे जागतिकीकरणाचे आहे. आपल्या मुलांना देशभरातीलच नव्हे तर जगभरातील संधी खुणावत आहेत व त्यासाठी इंग्लिश भाषेतील सफाई महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांना दोष देता येणार नाही, इंग्रजी माध्यमात शिकल्याने आपण मराठी भाषेचे शत्रू होत नाही.

महाराष्ट्रातील सर्व शाळांमधे (यात इंग्रजी माध्यमाच्या व कॉन्व्हेंट शाळा सुद्धा आल्या) मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. याशिवाय पालक मुलांना मराठी भाषेची गोडी लहानपणापासून लावू शकतात. मराठीत खूप सुंदर बाल साहित्य आहे. त्यात मुले मस्त रमून जातात. असे म्हणतात की कुठलाही विषय हा मातृभाषेतून शिकवला तर अधिक चांगला कळतो. भावना सुद्धा मातृभाषेतून व्यक्त केल्यास अधिक खोलवर रुजतात. पण हे सर्व कोवळ्या वयात, माती ओली असतानाच केले पाहिजे. शाळा व पालक दोघांनी ह्यात रस घेणे गरजेचे आहे.

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात पल्लेदार भाषणे ठोकणारे आणि मराठी भाषेच्या भविष्यासाठी गळे काढणारे तिच्या संवर्धनासाठी काय करत आहेत ? का नाही मराठी प्रेमी संस्था शाळकरी मुलांमध्ये मराठीचे प्रेम निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न करत ? फक्त ज्येष्ठांसाठी कार्यक्रम करण्यापेक्षा शाळा कॉलेज मधील मुलांसाठी मराठी भाषे संबंधात कार्यक्रम करणे, उपक्रम राबवणे जास्त महत्वाचे नाही का? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर गेले अनेक वर्षे सुरु आहेत. आता तर आपल्याकडे ‘डबल इंजिन’ सरकार आहे, मग हे का होत नाहीये ? उठसुठ मोर्चे काढणारे आपण ह्या कारणासाठी एकही मोर्चा का काढू शकत नाही ?

मित्रांनो, करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण करणार कोण ?

Back to top