संपादकीय – नोव्हेंबर २०२३

संपादकीय – नोव्हेंबर २०२३

नुकताच दीपावलीचा आनंदोत्सव पार पडला आहे, विविध सांगीतिक कार्यक्रमांनी नटलेला, रोषणाईने सजलेला व पंचपक्वानांनी भरगच्च भरलेला हा सण आपण पार्लेकर दर वर्षी उत्साहात साजरा करतो तसा ह्या ही वर्षी केला. तसे पाहता दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व विशद करण्यासाठी आपल्या पुराणात अनेक कथा आहेत. धर्म व निसर्ग ह्याची फार सुंदर व घट्ट सांगड आपल्या पूर्वजांनी घातली होती ह्यात शंका नाही. अर्थात सध्याच्या काळात मुंबई सारख्या निसर्गाच्या फारश्या खुणा शिल्लक न राहिलेल्या शहरात ह्या गोष्टींचे औचित्य उरले नाहीये हे ही तितकेच खरे आहे. आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी हा एक आनंदाचा, मित्र- नातेवाईकांच्या गाठी भेटी घेण्याचा, मनोरंजनाचा, गोड धोड खाण्याचा आणि नेहमीच्या routine चा शीण घालवण्याचा काळ असतो व त्यात काही वावगेही नाही.

दिवाळी हा हिंदूंचा सण आहे. असे म्हणतात कि एके काळी, म्हणजे ख्रिस्त जन्माच्या आधी जगातील अनेक भागात वैदिक संस्कृती नांदत होती. आजही त्याच्या खुणा आपल्याला अनेक ठिकाणी व अनेक प्रकारे दिसतात. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये तर ती होतीच पण बाली, कंबोडिया, थायलंड मधील हिंदू मंदिरे, मध्य पूर्वेमधील अनेक प्राचीन वास्तू, अनेक लॅटिन व इंग्लिश शब्दांची संस्कृत व्युत्पत्ती (mother – मातर, brother – भ्रातर, september सप्त अंबर या सारखे असंख्य) हे सर्व हेच दर्शवतात. पुढे काळाच्या ओघात अनेक पंथ, धर्म अस्तित्वात आले, धर्मान्तरे झाली पण अनेक ठिकाणी आजही प्राचीन संस्कृती जपली जाते, पुजली जाते. म्हणूनच दिवाळी हा सण आज फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशात साजरा होतो. फक्त हिंदू धर्माचेच नव्हे तर इतर धर्माचे, पंथांचे लोक सुद्धा आज दिवाळीच्या आनंदात उत्साहाने सहभागी होताना दिसतात. दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ वरची रोषणाई, अमेरिकेतील व्हाईट हाउस मधील सोहळा हे ह्याचेच द्योतक नव्हे काय ?

सर्वांना ‘आम्ही पार्लेकर’ तर्फे दिवाळीच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !

Back to top