संपादकीय – ऑक्टोबर २०२३
गेल्याच महिन्यात गणपती उत्सव धूमधडाक्यात पार पडला आणि ह्यावर्षीच्या सणासुदीच्या पर्वाला सुरवात झाली. पालयति सुद्धा दरवर्षीप्रमाणे अनेक मंडळांनी हा उत्सव साजरा केला. ‘आम्ही पार्लेकर’ च्या प्रतिनिधीने बहुतेक मंडळांना भेट दिली, त्याविषयीचे फोटोफिचर ह्या अंकात आलेलेच आहे.
ह्या निमित्ताने काही गोष्टींकडे लक्ष देणे, काही गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे एक टिळक मंदिर सोडले तर इतर कुठल्याही मंडळाने उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले नव्हते. ह्या उत्सवाच्या निमित्ताने आजुबाजुच्या मुलांच्या काही स्पर्धा, काही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करायला काय हरकत आहे? टिळक मंदिराच्या कार्यक्रमांना सुद्धा गर्दी बेताचीच असते पण निदान वेगवेगळे कार्यक्रम होतात तरी. पार्ल्यातील इतर मंडळांच्या मूर्ती खूपच भव्य व देखण्या होत्या पण देखाव्यांचा दर्जा उंचावायला वाव होता. टिळक मंदिराची मिरवणूकसुद्धा पहाण्यासारखी असते. लेझीम पथक, पारंपरिक वेशातील नागरिक, आटोपशीर शिस्तबद्ध पद्धतीने ठरलेल्या मार्गावरून जाणारी हि मिरवणूक पाहून सुद्धा मन प्रसन्न होते. इतर बहुतेक मंडळांच्या मिरवणूका म्हणजे चित्रविचित्र पद्धतीने फिरणारे रंगीबेरंगी दिवे, DJ वर लागलेली, डेसिबलची मर्यादा न पाळणारी बीभत्स गाणी आणि त्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई. गेली अनेक वर्षे हेच चालले आहे.
लोकमान्य टिळकानी सुरु केलेल्या ह्या उत्सवाचे स्वरूप शतकभरात बदलणार नव्हे बदललेच पाहिजे ह्याची आम्हालाही जाणीव आहे. कलाकारांच्या कलेला, तरुणांच्या उर्जेला आणि नागरिकांच्या भक्तीला ह्या उत्सवात योग्य स्थान असावे असेच आम्हाला वाटते. त्याच बरोबर गणपती हि विद्येची देवता आहे हे कसे विसरून चालेल? त्यामुळे ह्या सर्वांचा उचित संगम जर ह्या उत्सवात झाला तर सर्वांचेच समाधान होईल.
लोकं पायांच्या प्रत्येक गोष्टीकडे एका अपेक्षेने पाहतात, ह्याचीही जाणीव ठेवणे अगत्याचे आहे. त्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्यासाठी पायांतील मंडळांना काही मदत लागली तर ‘आम्ही पार्लेकर’चे दरवाजे सदैव उघडे असतील ह्याची खात्री बाळगा !