संपादकीय – सप्टेंबर २०२३

संपादकीय – सप्टेंबर २०२३

मी नेहमी गंमतीत म्हणतो की ज्याप्रमाणे पंजाब सारख्या सीमाप्रांतात रहाणार्‍या कुटुंबातील एकतरी व्यक्ती सैन्यात असते त्याचप्रमाणे पार्ल्यातीत कुटुंबातील एकतरी व्यक्ती परदेशी असते. त्या अर्थाने आपल्याला नागपूरपेक्षा न्यूयाॅर्कच जवळ आहे असे म्हटले तर ती फार अतिशयोक्ती ठरु नये. सांगायचे तात्पर्य हे की परदेशाशी, विशेषत: अमेरिकेशी तर आम्हा पार्लेकरांचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. अनेक घरांमधे तर एकवेळ भारताचा नकाशा नसेल पण अमेरिकेचा मोठ्ठा नकाशा भिंतीवर ऐटीत विराजमान असतो.

अमेरिकेत किती टाइम झोन आहेत ? कोणत्या शहरात (अर्थात अमेरिकेतील) आत्ता किती वाजले असतील ? कुठे किती बर्फ पडतो ? तिकडे जायला कुठले महिने चांगले ? कोणती एअरलाईन चांगली ? तिकिटांचे दर सर्वात कमी कधी असतात ? खायचे पदार्थ चेक इन बॅगेतून न्यावे की नाही ? पार्ल्यातील ज्येष्ठ लोकांच्या गप्पांमधे हेच विषय हिट असतात. महाराष्ट्रातील दुष्काळापेक्षा अमेरिकेतील आयटी कंपन्यांतील लेऑफ मुळे आम्ही जास्त चिंतातूर होतो. सध्या ‘तिकडील’ नोकरीची, व्हिसाची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने पार्ल्यातील अनेक घरांवर डौलाने फडकत असलेला अमेरिकेचा ध्वज सध्यातरी अर्ध्यावर उतरवला गेला आहे व बायडन काकांच्या नावाने बोटे मोडणे सुरु आहे.

अमेरिकेत पायाभूत सोयी चांगल्या आहेत, ऑफिसात व इतरत्रही वातावरण मोकळे ढाकळे आहे, पैसे कमवायच्या तसेच उडवायच्या अगणित संधी आहेत हे नाकारण्याचे कारण नाही मात्र एका बाबतीत आपली मुंबई निर्विवादपणे सरस आहे, ती म्हणजे वैद्यकीय सेवा. ती फक्त स्वस्त आहे असे नाही तर दर्जात सुद्धा कुठेही कमी नाहीये. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या सहजतेने इथे आपण डाॅक्टरांकडे जाऊ शकतो तसे तिकडे शक्य नसते. इमर्जन्सी नसेल तर अपाॅइंटमेंट मिळायलाच अनेक दिवस लागतात. मानवी चेहेरा नसलेल्या व पूर्णपणे इंशुरन्स व फार्मा कंपन्यांच्या विळख्यात सापडलेल्या अमेरिकन वैद्यकीय सेवेची अवस्था बिकट आहे.

मित्रांनो एक लक्षात ठेवा, फिरायला, मजा करायला अमेरिका भलेही ‘ड्रीम डेस्टिनेशन’ असेल पण आजारी पडावे ते भारतातच !

Back to top