चौकटीपलीकडची वाटचाल
‘आशिआना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम’ या शाळेचा दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रोप्य महोत्सव पार पडला. सुहासिनी आणि रवी मालदे या आर्किटेक्ट दाम्पत्यानी १९९४ च्या सुमारास अवघ्या पाच ऑटिस्टिक मुलांसोबत या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू केलं आणि ऑक्टोबर १९९८ मध्ये ‘आशिआना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम’ची स्थापना झाली. नित्यानंद मार्ग म्युनिसिपल स्कूलच्या आवारात असलेल्या या शाळेत मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच नृत्य, योग, सायकलिंग, स्केटिंग आदी सांस्कृतिक-क्रीडा कौशल्यांचा आनंद लुटत चित्रकला, हस्तकला आदी कौशल्ये शिकवली जात आहे याचं अतिशय उत्तम प्रतिबिंब रविवारच्या कार्यक्रमात उमटलं होतं.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गायक-संगीतकार मिलिंद जोशी यांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमात सुहासिनी मालदे यांच्या ‘एक इझम निरागस’ या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचं प्रकाशनही झालं. डॉ सुहासिनी आणि रवी मालदे यांनी ‘आशिआना’ ही विशेष शाळा २५ वर्षे अनेक आव्हानांना तोंड देत उत्तमरित्या सुरू ठेवली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.