संवादिनीच्या अभिवाचनाने उजळली स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४१ व्या जयंतीचं औचित्य साधून, स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्राच्या सभागृहात, ‘सावरकर वाङ्मय दर्शन’ हा आगळा, अभिवाचनाचा कार्यक्रम दि. २८ मे रोजी पार पडला. संकल्पना होती केंद्राचे विद्यमान कार्यवाह प्रा. केशव परांजपे यांची. त्यांनी विलेपार्ले येथील वाचन मंडळ, ‘संवादिनी’ च्या सदस्यांना वाचनासाठी पाचारण केले होते. संवादिनी हे विलेपार्ल्यातील सव्वीस वर्षं जुनं वाचन मंडळ आहे. मंडळाच्या सदस्या दर महिन्याला एक पुस्तक ठरवतात. एकमेकींच्या घरी जमून त्या पुस्तकाचं परीक्षण, पुस्तकावर चर्चा करतात. या कार्यक्रमात सदस्यांनी स्वा. सावरकर लिखित जोसेफ मॅझीनी, १८५७ चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने हे ग्रंथ, मोपल्यांचे बंड ही कादंबरी, संन्यस्त खड्ग हे नाटक तसेच कमला हे खंडकाव्य, स्वदेशी फटका, तनुवेल, ने मजसी ने ही काव्ये, या वाङ्मयातील उताऱ्यांचे वाचन केले. मेधा आंबर्डेकर, मधुरा हेर्लेकर, नीलिमा नगरकर, स्नेहा अभ्यंकर, सुषमा सामंत, अनुश्री क्षीरसागर यांचा वाचनात सहभाग होता. कार्यक्रमाला पार्ल्यातील जाणकार उपस्थित होते.
यानंतर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनात सहभागी खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. तसेच स्वा. सावरकर सेवा केंद्राच्या आरोग्य विभागाशी संलग्न ॲक्युप्रेशर रुग्णसेवेत विशेष योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती सुहासिनी साठे यांनी भूषवले. यानंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपन्न झाला.