वीर सेनानी फाउंडेशन तर्फे शस्त्र प्रदर्शन आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन
वीर सेनानी फाउंडेशन ही शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तसेच सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकारी यांच्या कल्याणाकरता स्थापन झालेली एक सामाजिक संस्था आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे, त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांना, अधिकाऱ्यांना वैद्यकीय अथवा इतर बाबतीत मदत करण्याचे काम या संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष कर्नल विक्रम पत्की (सेवानिवृत्त) आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनियमाने सुरू असते.
भारतीय सैन्य वापरत असलेल्या विविध शस्त्र आणि साहित्य यांची माहिती सर्व सामान्यांना व्हावी आणि सैनिकांबरोबर त्यांना संवाद साधता यावा तसेच भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी या कार्यक्रमांमध्ये भारतीय सैन्य दलाच्या आर्मी रिक्रुटमेंट सेल तर्फे मार्गदर्शन व्हावे यासाठी दिनांक ६ व ७ एप्रिल रोजी पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानामध्ये पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि वीर सेनानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शस्त्र प्रदर्शन आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद’ आयोजित करण्यात आली असून या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आहे व यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमात दिनांक ६ व ७ रोजी वेगवेगळ्या चर्चा संत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष कार्यक्रम —
शनिवार दिनांक ६ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ राष्ट्रीय सुरक्षा ‘ या विषयावर ले. जनरल, विनोद खंडारे, पी. व्ही. एस. एम, ए. व्ही. एस. एम, एस. एम.( निवृत्त ) (मुख्य सल्लागार, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार.), राजदूत सुजन चिनॉय, (महासंचालक मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड एनालेसिस ), डॉ. भूषण कुमार उपाध्याय आय.पी एस.( निवृत्त ), माजी पोलिस महासंचालक आणि कमांडंट जनरल होमगार्ड महाराष्ट्र राज्य, श्री. सुनील देवधर, प्रख्यात वक्ते आणि होम इंडियाचे संस्थापक कमोडर यांचा एक परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये श्रीकांत केसनूर, व्ही. एस. एम. ( कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ) हे भारतीय संरक्षण खात्यातील उच्च अधिकारी आणि युद्धशास्त्राचे नामवंत जाणकार भाग घेतील.
रविवार दिनांक ७ रोजी सायंकाळी ६ वाजता, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या व स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी संगीत दिलेल्या आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विविध गीतांचा, ‘स्वतंत्रते भगवती’ हा कार्यक्रम नामवंत गायक डॉ. भरत बलवल्ली, वैशाली सामंत, नचिकेत देसाई, सानिका अग्निहोत्री हे कलाकार सादर करतील आणि यामध्ये पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांचा विशेष सहभाग असणार आहे.